पुणे : सहजपुर – नांदूर येथील कंपन्याबाबतीत असलेल्या विविध प्रश्नांसाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, सोमनाथ बोराटे व राजेश पारवे हे दि. १ जुलै पासून संस्कृत येथील फील्डगार्ड कंपनी समोर आमरण उपोषण करत असून आज उपोषणाचा ६ वा दिवस असूनही कंपनी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चर्चा न केल्याने नांदूर व सहजपूर गावातील संत तरुणांनी अर्धनग्न आंदोलन करीत उपोषण कर्त्यांना पाठिंबा दर्शविला.
याबाबत अधिक माहिती अशी की सहजपूर व नांदूर परिसरातील चार तरुणांनी १ जुलै पासून स्थानिक सहजपूर व नांदूर परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, नांदुर सहजपुर येथील कंपन्यातील केमिकल मिश्रीत पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, पिण्याचे स्त्रोत खराब होत असून याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कंपनीतील छोटी मोठी कामे स्थानिकांना देण्यात यावी, सर्व कंपन्यांनी किमान वेतन कायदा पाळावा नांदुर-सहजपूर कंपन्यातील बॉयलरची उंची शासकीय नियमानुसार नसल्याने बॉयलरच्या राखेमुळे पिकांची वाढ खुटणे, पिके जळणे याबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळावा, कंपन्यांकडून स्थानिक लोकप्रतिनीधींना मिळणारी अपमानकारक वागणूक थांबावी तसेच सर्व कंपन्यांनी गौण खनिज उत्खनन कायदा पाळावा आदि मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.
पाच दिवस उलटूनही कंपनी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सहजपूर व नांदूर परिसरातील तरुणांनी आज सहाव्या दिवशी उपोषणस्थळी अर्धनग्न आंदोलन करीत उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला व उपोषणाबाबत तात्काळ योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
नांदूर सहजपूर भागातील विविध कंपन्यांकडून विशेषत फिल्टगार्ड कंपनीकडून स्थानिक नागरिकांवर कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी सातत्याने अन्याय होत आहे. यामध्ये प्रामुख्याने फ्लिट-गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, फेनस ऑटो लिमिटेड, पुष्पम फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी देवी दूध कंपनी, प्रामुख्याने या कंपन्यातून होणाऱ्या जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहेत.
कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणाकडे न फिरकल्याने कंपन्याच्या मुजोर कारभारा विषयी जनतेत रोष निर्माण झाल्यामुळे व दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे स्थानिक युवकांनी उपोषणस्थळी जाऊन अर्धनग्न आंदोलन केले व घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
उपोषणकर्त्याच्या जीवितास काय धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन व राज्य सरकार जबाबदार राहील अशी संतप्त भावना युवकांनी व्यक्त केली. उपोषण कर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले यांनी भेट दिली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून लवकरच कंपनी प्रशासनाबरोबर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले. याबाबत तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत संबंधित विभागांना माहिती दिली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
स्थानिक प्रतिनिधी व सत्ताधारी पक्षाचे आजी- माजी नेतृत्वाने स्थानिक भूमिपुत्रांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाहीत तर येणाऱ्या विधानसभेत आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधींना धडा शिकवू तसेच तिसरा पर्याय निवडून आणू अशी संतप्त भावना उपोषणकर्ते उमेश म्हेञे यांनी व्यक्त केली.