पुणे: पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत येत्या रविवारी (दि. ७) लेखी परीक्षा होणार असून परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाईपदाच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ५० जागांसाठी तीन हजारांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १६०० उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. मैदानी चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय, समांतर आरक्षणानुसार एकास दहा याप्रमाणे ३८३ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पुणे रेल्वे पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मैदानी चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या रविवारी (दि. ७) होणार आहे. परीक्षा लष्कर भागातील आझम कॅम्पसमधील ए. के. न्यू लॉ अॅकॅडमी अँड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर येथे होणार आहे.
उमेदवारांनी सकाळी सात वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. सकाळी साडे नऊनंतर उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षेसाठी आवाश्यक साहित्य लोहमार्ग पोलिसांकडून दिले जाणार आहे. पेन, पेन्सील, तसेच अन्य कोणतेही साहित्य उमेदवारांनी आणू नये, असे आवाहन दोशी यांनी केले आहे.