कर्नाटक : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. सिझेरियन प्रसूतीदरम्यान बाळाचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेत नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 जून रोजी अमृता नावाच्या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमृताची सामान्य प्रसूती होऊ शकली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर सी-सेक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलाचे पालक अर्जुन आणि अमृता यांनी आरोप केला आहे की, डॉक्टर निजामुद्दीन यांनी शस्त्रक्रियेदरम्यान नवजात बालकाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याचा मृत्यू झाला.
निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू
वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नवजात मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नवजात बालकाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.