अहमदनगर: नगर येथे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दुधाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेले आंदोलन अजूनही सुरूच आहे. खासदार निलेश लंके यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अडवल्यामुळे लंके यांनी तिथेच ठिय्या आंदोलनाचा पावित्रा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारून आंदोलकांना आश्वासन द्यावे, अशी भूमिका खासदार लंके यांनी घेतली आहे. उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे