मुंबई : भारत नुकताच टी20 विश्वविजेत्याची ट्रॉफी घेऊन भारतात परतला आहे. सगळीकडून भारतीय संघाचे स्वागत सोहळे होत आहेत. यातच विश्वविजेत्या टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे.
काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं : रोहित शर्मा
रोहित शर्मा याने यावेळी आपल्या मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, ‘सर्वांना माझा नमस्कार. इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार.. आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल अभिनंदन. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही… सर्वांमुळे हे सिद्ध झालं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता. त्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार.’
‘हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही’ : सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव सर्वांसमोर बोलताना म्हणाला की, इथं असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते. हा प्रसंगही मी कधीच विसरु शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असे सूर्या म्हणाला. सूर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं कौतुक केले. त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करु, असा विश्वास देखील व्यक्त केला.