पुणे : राज्यामध्ये सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. तसेच राजकीय नेत्यांचा वारीतील सहभागही यावर्षी चर्चेत आला आहे. शरद पवार स्वत: पायी वारीत सहभागी होणार आहेत, तर राहुल गांधींनाही वारीतील सहभागाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायी वारीत सहभागी होणार असल्याचे सांगितलं जात आहे. अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना अजित पवारांनी वारीचं महत्त्व आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, आपण स्वत : वारीत सहभागी होणार असल्याचेही सांगितलं आहे.
यावर्षी 17 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असल्यामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदरची ही पंढरीची वारी असल्याने यंदा राजकीय नेत्यांचीही वारी पंढरीत दिसून येत आहे.
यावेळी विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, ”वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे, वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली आहे. मी अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथील पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात वारी उत्सवात सहभाग घेतला. परंतु, मला काही अद्याप जाता आलं नाही, पण उद्या (दि.06) शनिवारी पालखी बारामतीमध्ये मुक्कामाला येणार आहे. परवा (दि.07) रविवारी मी, सकाळपासून काटेवाडीपर्यंत वारीत चालत जाणार असल्याचे सांगितले.
वारीला जागतिक नामांकन मिळायला हवे, यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मला दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, पण वारीला येणाऱ्या वारकऱ्यांप्रती एवढं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दाखवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील याच सरकारने केलेलं आहे, असेही अजित दादा विधानसभेत बोलताना म्हटले.
तसेच अजित पवार बोलताना पुढे म्हणाले, सगळ्यांनाच आता पंढरपूरच्या वारीच्या पालखीत चालत जावेसे वाटत आहे. तर आपणही सहभागी होऊया. असे म्हणत नाव न घेता अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जेष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. तसेच, जयंतराव येथील का नाही कुणास ठाऊक, पण मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणात तिथं घेऊन जायला तयार आहे, असे म्हणत अजित पवारांनी जयंत पाटील यांनाही हसत हसत आवाहन केले.