मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलैला मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, भांडुप जलशुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ, दक्षिण मुंबईत पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच फ्री वे (ऑरेंज गेट) ते ग्रँटरोड उन्नत मार्ग यासह अन्य काही प्रकल्पांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते.या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन होणार आहे.