ओझर : ‘बहुत हप्ते हप्ते करता है’ म्हणत टोळक्याने फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाचे वाहन अडवून २ लाख ३४ हजार रुपयांची रोकड लुटली. ओझर टाऊनशिप येथील उड्डाणपुलालगत मंगळवारी (दि. २) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडलेल्या या सिनेस्टाइल प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.१५ च्या सुमारास भारत फायनान्स इंडसलँड बँकेचे व्यवस्थापक पंकज कैलास खैरनार (वय २४) हे भारत फायनान्स कंपनीची वसुल केलेली रक्कम सॅकमध्ये ठेवून ती पाठीस लावून नाशिक येथून पिंपळगाव येथे दुचाकी क्र. (एमएच ४१ बीएन ४३२४) वरून जात होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ओझर टाऊनशिप येथील उड्डाणपुलाच्या शंभर मीटर पुढे चार अज्ञात इसमापैकी तीस ते पस्तीस वयाच्या दोघांनी महामार्गावरील झाडीतून येऊन पंकज खैरनार यांची दुचाकी अडवली व एक जण पाठीमागून स्कूटीवर आलेल्या इसमाने पंकज यांची मान पकडून ‘बहुत हप्ते हप्ते करता है’ असे म्हणत पाठीवर असलेल्या सॅकमधील दोन लाख ३४ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली, तसेच फिर्यादी पंकज यांना ढकलून देत संशयितांनी नाशिकच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी पंकज खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक तुषार गरूड करीत आहेत.