पुणे : अब्दुल सत्तारचं करायचं काय ? खाली डोकं वर पाय…!! अशा घोषणा देताना खडकवासला राष्ट्रवादी युवकच्या वतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदविला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबाबत मुक्ताफळे उधळणारे राज्याचे कृषी मंत्री यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे आयोजन खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद दबडे पाटील यांच्या वतीने सिंहगड रोडवरील वडगाव पुलाखाली करण्यात आले होते.
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अपमानकारक शब्द वापरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, नगरसेवक दिलीप बराटे, शुक्राचार्य वांजळेमी नगरसेविका सायली वांजळे, अनिता इंगळे, स्वाती पोकळे, खडकवासला युवक कार्याध्यक्ष कुणाल पोकळे, राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे, दशरथ मणेरे, खडकवासला विद्यार्थी अध्यक्ष साहिल कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या आंदोलनात ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील ताळमेळ अधोरेखित होत आहे. त्याबरोबरीने भारतीय काँग्रेसचे देखील काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी मिळून यावेळी अब्दुल सत्तार यांचा निषेध केला, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये रंगली.