मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) मुंबईचे पुनरुज्जीवन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) करणार आहे. त्यासाठी एनडीडीबीने राज्य सरकारकडे २५३.५७ कोटी रुपयांची मागणी केली असून सरकारने ही रक्कम भागभांडवलाच्या स्वरूपात देण्याचे मान्य केल्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.
आर्थिक गैरप्रकारांमुळे तोट्यात गेलेल्या महानंदचे व्यवस्थापन आणि प्रचालन गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या एनडीडीबीकडे सोपवण्यात आले आहे. एनडीडीबी २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी महानंदची प्रशासक म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे. सचिन अहिर, विलास पोतनीस, सुनील शिंदे यांनी महानंदचे व्यवस्थापन एनडीडीबीकडे सोपवले आहे का? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.