सातपूर : शिवाजीनगर परीसरात चार दिवसांपूर्वी चालत्या दुचाकीवर, गुलमोहर झाड पडल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना सोमवार व मंगळवारच्या रात्री स्वारबाबानगर येथील एका घरावर निलगिरीचे मोठे झाड घरावर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी सुदैवाने या घरातील संपूर्ण कुटुंब या घटनेतून बालंबाल बचावले आहे.
सातपूर स्वारबावानगर परीसरातील एका कंपनीच्या आवारात भले मोठे निलगिरीचे झाड आहे. या झाडामुळे कोणतीही जिवीत हानी किंवा नुकसान होऊ नये, म्हणून या निलगिरी झाडाची छाटणी करण्यात यावी, असा अर्ज अमिन शेख यांच्यासह नागरिकांनी मनपाला ३० मे रोजी केला होता. मात्र मनपा प्रशासनाने पहाणी करून झाड एमआयडीसी क्षेत्रातील असल्याचे सांगत, त्यांच्याकडेच पाठपुरावा करण्याचे सांगत झाडाची छाटणी करण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे नागरिकांनी १२ जूनला कंपनीला पत्र दिले.
मात्र पुढचा पाठपुरावा अन् प्रत्यक्ष कार्यवाही होण्यापूर्वीच, जोरदार पावसाच्या तडाख्याने मध्यरात्रीच्या सुमारास संबधित निलगिरीचे झाड अमिन शेख यांच्या घरावर कोसळले. मात्र, सुदैवाने झाड कोसळले, त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबिय आतील घरात झोपलेले होते. त्यामुळे शेख कुटुंबिय थोडक्यात बचावले. घराच्या छतावर झाड कोसळल्याने छताच्या पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासन ते एमआयडीसी अशा अर्जाच्या प्रवासातच, झाड शेख कुटुंबाच्या घरावर कोसळल्याने प्रशासनाची धोकेदायक वृक्ष छाटणीविषयी असलेली उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याअगोदरच कारवाई करून धोकादायक वृक्षाची छाटणी करण्याची मागणी अमीन शेख यांनी केली आहे.