विशाल कदम
लोणी काळभोर : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अपमानकारक शब्द वापरला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. एका महिलेचा अपमानकारक शब्द वापरून विनयभंग केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी केले आहे.
हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणी काळभोर येथे आज (मंगळवारी ता.८) तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन सुरेश घुले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुरेश घुले म्हणाले कि, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व महिलांचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी व सत्तार यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांना पुणे जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही. असा कडक इशाराही सुरेश घुले यांनी यावेळी दिला आहे.
काय म्हणाले होते कृषिमंत्री अब्दुल सत्तार :
औरंगाबादमध्ये एका चॅनेलच्या पत्रकाराने सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी ५० खोक्यांबाबत केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सत्तार यांनी ऑन कॅमेरा सुप्रिया सुळे यांना एकेरी उल्लेख करत शिवी घातली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे कि, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर जावून त्यांचा व्यक्तिगत अवमान, अपमान व त्यांचा वियनभंग करणारे जाहीर व्यक्तव्य व शिवीगाळ केली आहे. त्यांचे वक्तव्य प्रसार माध्यमात काल सोमवारी (ता. ०७) नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले आहे. याबाबत सत्तार यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा.
अब्दुल सत्तार हे मंत्री पदावर आल्यापासून वारंवार अससंदीय भाषेचा वापर करून इतरांचा अपमान करीत आहेत. ते मंत्री पदावर राहण्यास लायक व पात्र नाहीत. त्यांचा हवेली तालुका राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो तरी सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे राज्यप्रमुख सोनबा चौधरी, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी नंदू काळभोर, विनायक शिंदे, रमेश घुले, रामदास चौधरी, अजिंक्य तुपे, नागेश काळभोर, सनी चौधरी, अमित काळभोर, स्वराज तुपे संजय राखपसरे, सुरेखा भोरडे, स्मिता नॉर्टन, सुरेखा खोपडे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.