पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान विजय शिवतारे आणि अजित पायावर यांच्यातील शाब्दिक युद्ध सर्वांनी अनुभवलं आहे. नंतर मतभेद मिटवत हे दोघे नेते एकत्र आलेले सर्वानी बघितलं आहे. आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत विधान केलं आहे. मात्र, यावेळी अजित पवार यांच्यासमवेत आपली मैत्री असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात विजय शिवतारे सहभागी झाले होते.
त्यावेळी, त्यांनी अजित पवार हे आपले मित्र असून त्यांच्याबद्दल मिठाचा खडा पडेल, असं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतून शिवतारे यांनी तयारी सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे.
संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये माजी मंत्री विजय शिवतारे सहभागी झाले होते. तर, मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातही विजय शिवातरेंचा सहभाग दिसून आला. यावेळी, बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण आमदार आणि मंत्री व्हावे, हीच मागणी पांडुरंगाकडे केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. पालखी सोहळा सासवड नगरीत येणे म्हणजे आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. पालखी सासवडमध्ये उशिरा येण्यामागे प्रशासन काही प्रमाणात जबाबदार आहे, ही काळी नजर कुणाची आहे, हे आमदारांना विचारावे लागेल, असे शिवतारे यांनी यावेळी म्हटले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांविरुद्ध त्यांनी पुकारलेले बंड राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरले होते. मात्र, त्यांनी काही दिवसांतच आपले बंड मागे घेतले होते. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांबद्दल विधान केलं असून, अजित पवार माझे मित्र आहेत, हे सरकार पुन्हा यावे आणि मी मंत्री व्हावे, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे.
मी मंत्री व्हावं हेच मागणे
अजित पवारांबद्दल, मी महायुतीत मिठाचा खडा पडेल, असे काही वक्तव्य करणार नाही, साखर पडेल असेच मी बोलेल. अजित पवार माझे मित्र आहेत, हे सरकार परत यावे, मी आमदार व्हावे आणि मंत्री व्हावे अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केल्याचंही विजय शिवतारे यांनी म्हटले.