नवी मुंबई: नाशिक येथे राहणाऱ्या एका तरुणाने पनवेल येथील २७ वर्षीय तरुणीसोबत ९ वर्षे प्रेमसंबंध ठेवून, तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अचानकपणे लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या यातील तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी विजय प्रकाश गोरे (२८) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील मृत तरुणी पनवेल येथे तर आरोपी प्रियकर विजय गोरे हा नाशिक ओझर येथे राहण्यास आहे. २०१६ मध्ये या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. यादरम्यान विजय गोरे याने तरुणीसोबत अनेक वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर २०२० मध्ये दोघेही लग्न करणार असल्याचे तरुणीने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. या दोघांच्या लग्नास तरुणीच्या आई-वडिलांनी होकार दिला होता. गेल्या ९ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. त्यानंतर गत मे महिन्यामध्ये विजयने त्याच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नास विरोध असल्याचे तसेच त्यांनी दुसऱ्या मुलीसोबत त्याचे लग्न करण्याची तयारी सुरू केल्याचे तरुणीला सांगून लग्नास नकार दिला होता.
त्यानंतर तरुणीने आपल्या वहिणींसह नाशिक येथे जाऊन विजय गोरे याची भेट घेऊन त्याला लग्न न करण्यामागचे कारण विचारले होते. त्यावेळी विजय गोरे याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्या सोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर या तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी विजय गोरे याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते, मात्र तो पोलीस ठाण्यात सुद्धा हजर झाला नाही, त्यानंतर खचलेल्या या तरुणीने कामावर जाणे सुद्धा बंद केल्याने ती मानसिक तणावाखाली आली होती.
याच मानसिक तणावातून या तरुणीने गेल्या २३ जून रोजी दुपारी घरामध्ये कोणीही नसताना बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या दोन बहिणींसाठी तसेच विजय गोरे याच्यासाठी अशा ३ चिठुधा लिहून ठेवल्याचे आढळून आले. विजय गोरे याच्यासाठी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये तरुणीने अनेक गोष्टी लिहून ठेवल्याचे आढळून आले. यावरून विजय गोरे याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात विजय गोरे याच्या विरोधात तक्रार दाखल केली.