– महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे (दौंड) : वातावरणातील चढ उतारामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. रुग्णांना मुख्यतः थंडी ताप, अंगदुखी या लक्षणांना सामोरे जावे लागत आहे. देऊळगाव राजेतील नऊ रुग्णांना डेंग्यू आणि चिकनगुणियाची लागण झाल्याचे NIV च्या रिपोर्ट मधून समोर आले आहे. त्यातील काही देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि काही रुग्ण खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यू, गोचीड ताप आणि चिकनगुणिया सह इतर साथीच्या आजारांचे रूग्ण अनेक असल्यामुळे या ठिकाणी बेडची कमतरता पडू शकते. देऊळगावराजे मधील बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये डासाच्या अळ्या वाढल्याचे दिसून आले .
देऊळगावराजे मधील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये जंतूंचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.
संबधीत शासकीय संस्थांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा विडा उचलून, उद्रेक दाबण्यासाठी जोर दिल्याचे दिसून येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. साचलेले पाणी सांडून दिले जात आहे. तसेच जिथं शक्य नाही तिथे औषधे व गप्पी मासे सोडण्यात येत आहे. तसेच रुग्णांशी संवाद साधला असता योग्य उपचार व सोय असल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
देऊळगावराजे ग्रामपंचायत मार्फत तेथील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केलेल्या आहेत. तसेच फॉगिंग फवारणी सुद्धा सुरु केली आहे. गावामध्ये रिक्षा लावून डेंग्यू आणि चिकणगुणिया बाबत जनजागृती केली आहे. तरी आपापल्या परिसरामध्ये ग्रामस्थांनी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
– अमीर शेख, ग्रामसेवक – देऊळगाव राजेदेऊळगावराजे येथील आडमाळ परिसरामधील आमच्या पथकामार्फत तपासणी केली असून प्रत्येक ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये औषध सोडलेले आहेत. तसेच कुठल्याही ग्रामस्थाला लक्षणे आढळल्यास देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क करावा. आता पर्यंत आरोग्य केंद्रामधून खुप रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना लक्षात घेऊन आरोग्याची काळजी घेतली तरच पुढे परिस्थिती आटोक्यात राहील.
– अविनाश अलमवार, वैद्यकीय अधिकारी