यवत : जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत मुक्कामी येत आहे. यानिमित्ताने यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.
संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम पालखी सोहळा आज बुधवार (दि.03) सायंकाळी यवत मुक्कामी येणार आहे. पालखी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास एक हजार किलो पेक्षा अधिक पिठलं तयार करण्यासाठी आज सकाळपासूनच लगबग सुरू झाली आहे.
गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच – दहा भाकरी पासून 1000 भाकरी मंदिरात आणून देतात. तर श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मंदिर परिसरात 300 किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आगमन व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. यवत येथील पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांसह नागरिकांमध्ये आतुरता असते.