पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. अशातच आत्ता पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश पवार आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र जाधव टोळीवर मोक्काअतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 98 गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख अविनाश राकेश पवार (वय-28), संतोष उत्तम चौगुले (वय-30), ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेंद्र पाटील (वय-27), यश बाबू गरुड (वय-18), निसार मोहम्मद शेख (वय-25), रेणुका मारुती पवार (वय-36 सर्व रा. दत्तनगर, चिंचवड), रंजना उत्तम चौगुले (वय-52 रा. मोहननगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर 11 गुन्ह्याची नोंद आहे.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख जितेंद्र आनंदा जाधव (वय-23), आकाश उर्फ बबुल दत्ता मोरे (वय-19), अमन समिर शेख (सर्व रा. ओटास्किम, निगडी, पुणे), अल्पवयीन मुलाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारावर ७ गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, टोळी प्रमुख अविनाश पवार आणि जितेंद्र जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी पिंपरी, वाकड, चिखली, निगडी, रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध मोक्काअतंर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या कागदपत्रांची छाननी करून मोक्काअतंर्गत कारवाईचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले.