येरवडा, (पुणे) : येरवड्यात बचत गटाच्या थकीत पैशाची मागणी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या अंगावर पाळीव कुत्रे सोडल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात कुत्र्याने चावा घेतल्याने सदरची महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 30 जून रोजी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी महिला ज्योती रघुनाथ शिर्के (वय-42) व तिचा भाचा मिहीर शिर्के (वय-25, दोघेही रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दह्क्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेने अनेक महिलांना बचत गटाच्या नावाखाली पैसे मिळवून देते, म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. पैसे परत न करण्यासाठी टाळाटाळ करीत थेट घरातील कुत्र्याला अंगावर सोडणे, ही बाब गंभीर असून या घटनेत फिर्यादी महिलेच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही बचत गटातील थकीत रक्कम मागणी करण्यासाठी आरोपी ज्योती शिर्के या महिलेच्या घरी गेली होती. यावरून सदर महिला आणि तिचा भाचा मिहीर यांनी तिला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला तीन ते चार वेळा चावा घेऊन रक्तबंबाळ केले.
या श्वानाच्या हल्ल्यात सदरची महिला ही गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर महिलेने तिची सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.