पुणे : महानगरपालिका हद्दीत सामाविष्ट करण्यात आलेल्या गावांपैकी धायरी गावासाठी ६० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून हा निधी रस्ते,
स्मशानभूमी, मंदिरे, ड्रेनेजलाईन अशा विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांनी सांगितले.
पालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी यामध्ये सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असणारे धायरी, नऱ्हे, नांदोशी, खडकवासला आदी उपनगरातील गावे समाविष्ट करण्यात आली होती.
स्थानिक नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या वतीने नागरी समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश मिळताना प्रशासनाच्या वतीने ६० लाख रुपयांच्या विकास निधीची मंजुरी देण्यात आली असून ही कामे तातडीने करण्यात येणार असल्याचे नगरसेविका पोकळे यांनी सांगितले.
या निधीद्वारे धारेश्वर मंदिर परिसरातील इमारतीचे काम, धायरी स्मशानभूमी विकास कामे, बेनकर वस्ती विभागातील ड्रेनेजलाईन विषयक काम, अंबाई माता मंदिर परिसरातील रस्ते विषयक कामे, काँक्रीट ब्लॉक विषयक कामांचा सामावेश करण्यात आला आहे.
याविषयी बोलताना नगरसेविका अश्विनी पोकळे म्हणाल्या, केवळ दोन वर्षांपूर्वी ही गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत.या भागात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देताना या भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.