कोलकाता : पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका जोडप्याला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारा व्यक्ती तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सदर घटना समोर आल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लीम राष्ट्रात अशाच शिक्षा होत असतात, असे विधान केले असल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला घेरले आहे.
पोलिसांनी रविवारी (दि.30 जून) आरोपी ताजिमूलला अटक केल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी ज्या महिलेला बेदम मारहाण झाली, तिलाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला. ताजिमूलशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले असले तरी या कृत्याचे मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. पीडित महिलेचे कृत्य समाजविरोधी असल्याचे ते म्हणाले. तसेच हा विषय त्या गावातील असून त्याचा आणि पक्षाचा काडीचाही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणासंदर्भात भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीचा भेसूर चेहरा या कारणामुळे पुन्हा समोर आला आहे. या प्रकरणी व्हायरल होणा-या व्हिडीओत मारहाण करणारा आरोपी हा स्वतःला न्यायदूत समजतो. चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांचा तो विश्वासू सहकारी आहे. पश्चिम बंगालच्या प्रत्येक गावात संदेशखालीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिलांसाठी शाप बनल्या आहेत. ज्याप्रमाणे शेख शाहजहानसाठी ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या होत्या. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी त्या आता पुढे येतील का, असा प्रश्न उपस्थित करत अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडेतोड टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार रहमान म्हणाले, “आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण त्या महिलेनेही चुकीचं कृत्य केलं. तिनं स्वतःचा नवरा, मुलगा आणि मुलीला सोडून दिला आणि ती दृष्ट बनली. अशा कृत्याविरोधात मुस्लीम राष्ट्रात काही नियम आणि न्याय पद्धती आहे. तरीही जे झालं, ते थोडं अती होतं. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”