मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीच्या मुद्द्यावर रणकंदन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त असल्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम असून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिली आहे.
विधान परिषदेत भाजपाचा सभापती असावा : चंद्रशेखर बावनकुळे
विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असं वक्तव्य नागपुरात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
विधान परीषद सभापती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक पार पडणार या बैठकीला विधान परिषदेतील सदस्य आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. विधान परीषद सभापती पदासाठी नावं द्या, आम्ही बिनविरोध करतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची मानली जात आहे.