Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये किशोर दराडे पहिल्या क्रमकांवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, किशोर दराडेंनी अखेर विजय मिळवला.
नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरू होती. अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी घोषित केलं. नाशिक मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठं आव्हान किशोर दराडेंसमोर होतं.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत झाली.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी झाले. तर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन वसंत डावखरे यांनी बाजी मारली असून त्यांना 1 लाख 719 मते मिळाली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी झाले.