पिंपरी : खेड तालुक्यातील बोरदरा गावच्या हद्दीत मुलाला संपत्तीतील हिस्सा आणि रकम न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईच्या घरासमोरील कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे. तसेच राहत्या घरातील खुर्चीचे व खिडकीचे जाळून नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बोरदरा या गावात घडली.
याप्रकरणी खेड तालुक्यातील बोरदरा येथे राहणारी मुलाची आई जयश्री देविदास पडवळ (वय- ४१ वर्ष, रा. बोरदरा) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पृथ्वी देविदास पडवळ (वय-२४, रा. बडमुखवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पृथ्वी हा आई वडिलांपासून विभक्त राहतो. तो बोरदरा येथे आला होता. दरम्यान, आईकडे वारंवार त्याचा हिस्सा आणि पैसे मागत होता. त्याला हिस्सा आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या घरासमोर पार्क केलेली कार जाळून राहत्या घराच्या खिडकीचे व खुर्चीचे जाळून नुकसान केले असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करत आहेत.