लातूर : शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष पदावरून वाद सुरू झाला. वाद सुरु असताना दोन गटात दगड, काठ्या आणि पट्ट्याचा वापर करून जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आकाश लोंढे हा गंभीर जखमी असून, राजेश क्षीरसागर, विकास लोंढे, सूरज लोंढे, विनायक जोगदंड अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
लातुर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव कार्यकारिणी संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला 150 ते 200 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये अध्यक्षपदी राज क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. मात्र, विकास कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी यावरून वादावादी सुरू केली आणि नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले.
यावेळी धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले. यामध्ये पाचजण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.