लोणी काळभोर : पुण्यनगरीतील दोन दिवसांच्या मुक्काम आटोपल्यानंतर संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (२ जुलै) मुक्कामासाठी येणार आहे.
या दोन्ही पालखी सोहळ्यांतील वारकरी व भाविकांना वहातूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून पुणे – सोलापूर महामार्गावरील व पुणे – सासवड राज्यमार्गावरील वाहतूक २ जूलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी त्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
असा असेल वाहतुकीत बदल
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुण्याहून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील.
- सदर वाहतूक खडीमशीन चौक-कात्रज-कापूरव्होळ मार्गे वळवण्यात आली आहे.
- तसेच सासवड बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी सर्व वाहतूक गराडे – खेड शिवापूर मार्गे पुणेकडे येईल.
- पुणे येथून सासवड-जेजुरी वाल्हे निराकडे तसेच निरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगांव-निरा या मार्गाचा वापर करावा.
- पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- फलटण-लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग
- पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद-राहू-पारगांव-चौफुला या मार्गाचा वापर करतील.
- तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक चौफुला-पारगांव राहू- केसनंद वाघोली या मार्गाचा वापर करतील.
- पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा केसनंद-राहू-पारगांव न्हावरे काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील.
- सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने कुरकुंभ, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगांव, राहू, केसनंद, वाघोली या मार्गाचा वापर करतील.
- पुणे – सोलापूर महामार्गावरील पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक चौफुला न्हावरा मार्गे नगर रोड पुणे अशी, तर सोलापूर बाजूकडे जाणारी वाहतूक मुंढवा रोडने नगर चौफुला मार्गे सोलापूर अशी वळविण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी २ पोलीस उप आयुक्त, २ सहाय्यक पोलीस उप आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, ५० सहाय्यक पोलीस निरीक्षक व ६७५ पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शशिकांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार, श्री.तुकाराम महाराज पालखी सोहळा २ जुलै रोजी लोणीकाळभोर कदमवाकवस्ती पालखी तळ येथे मुक्कामी असून ३ जुलै रोजी लोणी काळभोर येथुन प्रस्थान करणार आहे.
सदर कालावधीत सर्व नागरिकांनी पुणे ते लोणी काळभोर जाणे – येण्यासाठी सोलापूर महामार्गांने न जाता जुना सोलापूर रोड फुरसुंगी अथवा फुरसुंगी फाटा मार्गे मांजरी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. वारकरी, भाविक यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्यामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व परिसरातील नागरिकांनी पालखी कालावधीत दिवसा अंत्यत गरज असेल तरच आपली वाहने रोडवर आणावीत आपण सर्वांनी लोणी काळभोर मध्ये येणारे वारकरी, भाविक यांना वाहतुकीची कोंडी होवुन त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी.