Ravindra Jadeja : विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्तीची माहिती दिली आहे. मात्र, इतर फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळत राहणार आहे. भारताने शनिवारी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले.
माझं हृदय कृतज्ञतेनं भरलं : रवींद्र जडेजा
रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे, ‘माझं हृदय कृतज्ञतेनं भरलं आहे. मी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. एका प्रमाणिकपणे पळणाऱ्या घोड्यासारखं मी देखील माझ्या देशासाठी कायम माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला आणि इतर फॉरमॅटमध्ये मी ते पुढे पण देईन. टी २० वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. हे माझ्या टी 20 कारकिर्दीचं शिखर आहे. मला दिलेल्या समर्थनासाठी, आठवणींसाठी आणि उत्साहासाठी सर्वांचे आभार.’
T20 विश्वचषक 2024 मधील जडेजाची कामगिरी
रवींद्र जडेजा अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्या वतीने खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2024 मध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. तो गोलंदाजीत आणि फलंदाजीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. सध्याच्या स्पर्धेत त्याने एकूण आठ सामने खेळले आणि केवळ 35 धावा केल्या. त्याचवेळी त्याला एकच विकेट मिळाली.
जडेजाच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रवींद्र जडेजाने 2009 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 74 सामने खेळले. यामध्ये, स्टार अष्टपैलू खेळाडूने 127.16 च्या स्ट्राइक रेटने 515 धावा केल्या आणि 54 विकेट्स घेतल्या. याशिवाय 2009 ते 2024 या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
या काळात त्याने एकूण 30 सामने खेळले. यामध्ये जडेजाने एकूण 130 धावा केल्या आणि 22 विकेट घेतल्या. त्याचबरोबर आशिया कपमध्ये सहा सामने खेळले. यामध्ये त्याने दोन डावात 35 धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या.