लोणी काळभोर : मागील २० वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील डाक बंगल्यात व परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. भुरट्या चोरांनी इमारतीच्या दरवाजांचे कडी-कोयंडे देखील उचकटून चोरी केले आहेत. तर याच ठिकाणी अंधश्रद्धेपोटी जादूटोणा, करणी व भानामतीसारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून धूळखात बंद असलेला डाक बंगला हा जादूटोणा व मद्यपींचाअड्डा बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 1639 मध्ये पावणे तीन एकर जागा आहे. या जागेत बांधकाम विभागाने शासकीय इमारत व कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली आहेत. हे शासकीय विश्रामगृह पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांच्या मिटिंग होत होत्या. तर बरेच वर्ष पोलीस याच बंगल्यात आरोपींना डांबून ठेवत होते. मात्र कालांतराने हे कार्यालय बंद पडले. डाक बंगला बंद पडल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली नाही.
डाकबंगल्यात व परिसरात भुरट्या चोरांनी व मद्यपींनी बस्तान बसवले आहे. खोल्या, कार्यालय, स्वच्छतागृहे व मैदानात बिअर व दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. अनेक जण अंधाराचा गैरफायदा घेत अंधश्रद्धेपोटी जादूटोणा, करणी व भानामतीसारखे प्रकार याच परिसरात करतात. तर चोरट्यांनी खोल्यांचे दरवाजे, चौकटी, कडी-कोयंडे देखील चोरून नेले आहेत. त्यामुळे सध्या या शासकीय इमारतीची भयावह अवस्था झाली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय होणार आहेत. या कार्यालयासाठी बेसिक सेंटर व डाक बंगल्याचा जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या प्रस्तावाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. येथे तहसिल कार्यालय झाल्यास इमारतीचा वापर योग्य कारणासाठी होईल आणि विद्रुपीकरण थांबेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सासवड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश निगडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
मद्यपींवर कडक कारवाई करावी…
एकेकाळी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसह नेत्यांची रेलचेल असायची. या ठिकाणी मोठमोठ्या शासकीय बैठका होत होत्या. मात्र आता हा डाकबंगला बंद पडून धूळ खात आहे. ही एक दुर्दैवी बाब आहे. ओस पडलेल्या इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग होऊ लागला आहे. तसेच जादूटोणा सारखे गंभीर प्रकार होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चोरट्यांवर व मद्यपींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.