अजित जगताप
सातारा : प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वप्रथम स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीच्या वतीने चेअरमन पदासाठी प्रथमच दोन महिला दावेदार ठरलेले असल्याने सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होत आहेत.
साताऱ्यातील शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच चेअरमन पदासाठी ७५ वर्षाची परंपरा मोडीत काढून स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीने भारती मदने व मनीषा महाडिक या दोन महिला उमेदवारांना चेयरमन पदी नियुक्त करण्यात येणार असल्याची अशी माहिती स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीचे प्रमुख शिवाजी खांडेकर, धनसिंग सोनवणे, गणेश दुबळे, ज्योतीराम जाधव, लक्ष्मण गुंजवटे यांनी दिली आहे.
सक्षम महिलांना प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार संभाळणे अवघड नाही. घरातील बजेट सांभाळणाऱ्या महिला बँकेचा कारभार पारदर्शकरित्या पार पाडतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुरुषी मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आमचा लढा असून आम्ही कोणत्याही शिक्षक संघटनेच्या विरोधात नाही. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून बँकेच्या हिताचा विचार करणार आहे. आमचे पॅनल निस्वार्थी पॅनल असून या प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सभासदांना राजीनामा देण्याची वेळ येणार नाही. असे आघाडीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
सेवानिवृत्त सभासदांनी दिलेल्या योगदानाची काळजी घेऊन कर्मचाऱ्यांशी सन्मानाची वागणूक मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना एका शिफ्ट मध्ये बँकेचे कामकाज करून बँकेच्या सेवेबद्दल लोकांना जनजागृती करण्यात येणार आहे. नागरी सुविधा देण्यासाठी ही बँक प्रयत्नशील राहणार असून ‘विमान’ चिन्ह हे प्रगतीचे चिन्ह आहे. सहा हजार महिला मतदार असून महिला राष्ट्रपती होऊ शकते. पंतप्रधान होऊ शकते.मुख्यमंत्री होतात मग, प्राथमिक शिक्षक बँकेत महिला चेअरमन का होऊ शकत नाही? असाही त्यांनी सवाल केला.
या चेअरमन पदाच्या संधीचं सोनं करून स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडी निश्चितच यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्हीही महिला या उच्च विद्याविभूषित असून गेले एकवीस वर्ष ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांना संधी मिळाल्यास बँकेची प्रतिमा उजळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जाईल. मयत कर्जदारांना 100% कर्जमाफी व सेवानिवृत्त सभासदांना स्वीकृत संचालक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.