पुणे : शहरात अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी जादा भाडे घेतात. अनेक जण मीटरने जाण्याऐवजी जास्त पैसे सांगून प्रवाशांना लूटतात, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आता जलद गतीने होणार आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने आरटीओने यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. प्रवासी १ जूनपासून व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर 8275330101 थेट तक्रार करू शकणार आहेत. याबाबत आरटीओकडून तातडीने कारवाई केली जाणार आहे.
आता प्रवाशांना सहजपणे तक्रार करता येणार
प्रवाशांना सहजपणे तक्रार करता यावी, यासाठी आरटीओने व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक सुरु केलेला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची तक्रार या व्हॉट्सॲप क्रमांकावर करता येणार आहे. त्यानंतर आरटीओ चे अधिकारी या तक्रारीची शहानिशा करतील. ही शहानिशा झाल्यांनतर तातडीने दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. या व्हॉट्सॲप हेल्पलाइनमुळे नियमभंगकरणाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रिया जलद गतीने होणार आहे.
रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भाडे नाकारणे तसेच अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी या तक्रारी जास्त प्रमाणात येतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद करण्यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी १ हजार ६१३ रिक्षाचालकावर कारवाई
गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आरटीओकडून २ हजार ४९५ रिक्षांची तपासणी केली होती. यामध्ये १ हजार ६१३ रिक्षाचालकावर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये भाडे नाकारल्याप्रकरणी ९०, तर मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ७२ आणि जादा भाडे आकारणाऱ्या ६० जणांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच ५७ चालकांवर प्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी देखील कारवाई करण्यात आली होती.