पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात बंदी असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी 28 जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास येरवडा कारागृहात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 42 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून जहीर बाबा लहूरी (रा. नाना पेठ, एडिगम चौक, आयना मस्जिद शेजारी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा सहा महिन्यापूर्वी खुन झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींना जहीर हा भेटण्यासाठी जाणार आहे, असं फिर्यादी यांना समजले. त्यामुळे फिर्य़ादी शुक्रवारी सकाळी येरवडा कारागृहात गेल्या. त्यांनी येरवडा कारागृहात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
फिर्यादी यांनी येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांना सांगितले की, आरोपींना भेटण्यासाठी आलेला जहीर लहूरी हा आरोपींचा कोणीही नातेवाईक नसून तो खोट्या कागदपत्राच्या आधारे आरोपींना भेटायला आला आहे. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांनी जहीर लहूरी याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने फिर्यादी महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला. तसेच फिर्य़ादी यांना धक्का देऊन पळून गेला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.