पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. दिवसेंदिवस शहराचा चौफेर विस्तार होत असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा आणि सेवा सक्षमपणे उलब्ध करुन देण्याचे आव्हान महापालिका प्रशासनाला पेलावे लागणार आहे. त्यासाठी नियोजित प्रकल्प उभारण्याबाबत जागा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच, संबंधित प्रकल्प मार्गी लावण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.
याबाबत महापालिका प्रशासक व आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरातील गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने गो-शाळा विकसित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटनांनी अनेकदा मागणी केली आहे. त्यामुळे गो-शाळा उभारणीकरीता सुमारे ६ एकर जागा उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. चऱ्होली- मोशी आदी भागात मोठ्या प्रमाणात गोवंश आहे. त्यासाठी सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
तसेच ‘डॉग पार्क’ आणि पेट हॉस्पिटलसाठी सुमारे ५ एकर जागा उपलब्ध व्हावी. शहरातील नागरिकांना आपले श्वान डॉग पार्कमध्ये फिरायला घेवून जाण्यासह श्वानांशी संबंधित सर्व वस्तू आणि सेवा, उपचार, प्रशिक्षण, नसबंदी केंद्र यासह अगदी जलतरण तलावसुद्धा उपलब्ध झाला पाहिजे. याकरिता डॉग पार्क विकसित करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या जनावरे मृत झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उपस्थित होते.
दरम्यान, जनावरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याकरिता विद्युत दाहिनी सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. त्यासाठी किमान १ एकर जागेची आवश्यकता आहे. कारण, भविष्यात पाळीव प्राणी हे नागरी जीवनाचा अविभाज्य भाग असून त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
पुण्यातील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्राणीसंग्रहालय विकसित करण्याची आवश्यकता आहे. सदर प्राणीसंग्रहालय १३० एकरमध्ये विकसित केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये किमान ३० एकर जागेवर प्राणीसंग्रहालय विकसित करावे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने प्राधान्याचे विचार करणे काळाची गरज आहे. प्राणी संग्रहालय विकासित झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.अशा सूचना आमदार लांडगे यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.