हडपसर, (पुणे) : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर उचकटून १९ लाख रुपयांचे मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या हडपसर पोलिसांनी बिहार राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मोनुसिंग (रा. बिश्णपुरा काला, थाना एकमा, जिल्हा सारण छप्रा, बिहार), साहिल अनिल मोरे (वय-२०, रा. देशमुखवाडी, इंगळे कॉर्नर, शिवणे), संकेत प्रकाश निवगुणे (वय २२ वर्ष रा. बानगुडे चाळ, चौक, यशोदिप सोसायटी, वारजे माळवाडी,) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ९७ मोबाईल, इंडिका कार, होंडा अॅक्टीवा दुचाकी असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोंबरला उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतील १९ लाख रुपयांचे १०२ मोबाईल चोरी झाल्याप्रकरणी स्वप्नील सुभाष परमाळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस सदर घटनेचा तपास पोलीस करीत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार साहिल मोरे यास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संकेत निवगुणे, लक्ष्मण ऊर्फ आण्णा जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत निवगुणे याला ताब्यात घेऊन सदर गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण आण्णा जाधव हा संघर्ष चोरीतील मालासह एकमा पोलीस स्टेशन, जिल्हा, छपरा बिहार मधील एका गावात असल्याची माहिती मिळाली. या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांना तात्काळ रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा आरोपी मोनुसिंग यांच्या बिहारमधील राहत्या घरी हडपसर पोलीसांनी छापा मारला. यावेळी लक्ष्मण आण्णा जाधव याला गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ९७ मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, आरोपी साहिल मोरे, गजानन मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःश्रुंगी या भागातील मोबाईलची दुकाने फोडून मोबाईल लक्ष्मण आण्णा जाधव यास देत होते. सदरचे मोबाईल हे लक्ष्मण आण्णा जाधव त्याचा साथीदार मोनु सिंग रा. बिहार यास विकत होता. मोबाईल विकून आल्यानंतर मोबाईलच्या किंमतीच्या ४० टक्के रक्कम ही आरोपींना मिळत होती. अद्यापपर्यंत आरोपींकडून गुन्ह्यातील ९७ मोबाईल, इंडिका कार, होंडा अॅक्टीवा दुचाकी असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लक्ष्मण जाधव हा पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहीजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंगर शिंदे, विश्वास डगळे (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांच्या पथकाने केली.