संतोष पवार
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट परिसरातील पळसदेव, अगोती चांडगाव (ता इंदापूर) या परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्री नऊच्या पुढे ड्रोन आकाशात घिरट्या घालत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या यंत्रणा असलेल्या या ड्रोनच्या घिरटयांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची भीतीपोटी झोप उडाली आहे. अवकाशात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात असून अनेक मोठ्या घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
बारामती आणि दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातही गेली पंधरा दिवसापासून रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.तोच आता या ड्रोनच्या घिरट्यांमुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव चांडगाव अगोती व करमाळा तालुक्यातील खातगाव,केतूर, पारेवाडी या परिसरात रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत चार ड्रोन फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या ड्रोनच्या साह्याने परिसराची पाहणी करून अनेक लहान मोठ्या चोऱ्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. व्हाट्सॲप आणि सोशल मिडियाच्या ग्रुपवर रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनबाबतचे मेसेज व्हायरल होत असल्यामुळे याबाबतचे गूढ कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची गरज आहे.