पुणे : पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात. या एकमेव हेतूने प्रेरणा घेत साज एंटरटेनमेंट निर्मितीसंस्थेअंतर्गत लेखक-दिग्दर्शक अखिल देसाई यांच्या “सीड बॉल्स” या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त प्रसिद्ध वास्तु-विशारद तज्ञ अशोक शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाला.
चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात का, हल्लीचे जे वातावरण आपण बघतोय, म्हणजे पुर येणे, पाण्याची पातळी खाली जाणे, प्रदुषण वाढले आहे, याला कारणीभूत आहे ते मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड़. ही वृक्षतोड़ होते ती पैसे कमवण्यासाठी, परंतु झाडे जगवून देखील तुम्हाला पैसे कमवता येतात असा संदेश या सिनेमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट मराठी सोबत इतर चार भाषेत डब केला जाणार आहे. चित्रपटात दोन गाणी असणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात नाशिक, ठाणे आणि कोकण परिसरात या सिनेमाचे चित्रिकरण होणार आहे. चित्रपटात सोनिया संजय, अवनी चव्हाण, उदय सबनीस, दुष्यंत वाघ आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर सलोनी, योगेश साठे, विकास थोरात, बबन जोशी, शरद गुरव हे इतर भूमिकेत दिसणार आहेत. छायांकन अजित सिंग, संगीत देव अहिरराव, गीते विनोद पितले यांचे असणार आहेत. झाडे लावा, झाडे जगवा आणि जी झाडं आहेत ती जगवने हा या चित्रपटाचा उद्देश आहे.