उमरेड : पाच महिन्यांपूर्वी चिमुकला कुटुंबात आला. तो सर्वांच्या लाडाचा होता. घरात सर्वत्र आनंदाचे क्षण होते; परंतु काळ रुसला, आई त्याला कुशीत घेऊन पलंगावर बसून दूध पाजत असताना तो काही कळायच्या आत खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. तो काही क्षणात मरण पावला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (२७ जून) सकाळी नऊ वाजता भिवापूर तालुक्यातील मंगरूळ गावात घडली. या घटनेनंतर आईने एकच हंबरडा फोडला.
राघव मंगेश नाकाडे (पाच महिने, रा. मौदा, ह.मु. मांगरूळ, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. फिर्यादी आकाश दिलीप बालपांडे (२७, रा. मांगरूळ, ता. भिवापूर) हे मृतकाचे मामा आहेत. त्यांनी उमरेड पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार नोंदविली. राघवची आई बाळाला पलंगावर दूध पाजत होती; परंतु काही कळायच्या आत कुशीतून निसटून तो पलंगावरून खाली पडला. बाळ काहीही हालचाल करीत नव्हते. तत्काळ उपचारार्थ प्रथम खासगी रुग्णालयात व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून बाळाला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास एपीआय मलकुवार करीत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.