Maharashtra budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावेळी अजित पवार यांनी तरुण तरुणींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. विविध शैक्षणिक संस्थातून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असतात.
त्यासोबतच डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळू शकतो. दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरु केली जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
तसेच विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन दिले जाणार असून त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच शासनाच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
अवसरी खुर्द येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द, जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली आहे.
यासोबतच राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाची काम करण्यासाठी सारथी, बार्टी आणि इतर सामाजिक संस्थांना भरीव अनुदान देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.