पुणे : नागरिकांनो सावधान…!!! ”शेठला लय दिवसांनी मुलगा झालाय”, ”मोफत साड्या व पैसे वाटप सुरु हाय”, अशी बतावणी करून जेष्ठ महिलांना लुटणारी गॅंग पुण्यात दाखल झाली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी दोन जेष्ठ महिलांना अडीज लाखाचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड आणि पाषाण परिसरात घडली आहे.
याप्रकरणी एका ८५ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या ७९ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, फिर्यादी या पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. माझ्या शेठला फार दिवसांनी लेकरु झाले आहे. ते महिलांना मुलगा झालाय”, ”मोफत साड्या व पैसे वाटप सुरु हाय” असे सांगून त्यांना गोल्डन बेकरीसमोर घेऊन गेला.
दरम्यान, त्या ठिकाणी आरोपीचा दुसरा साथीदार होता. त्याने लाल रंगाच्या पिशवीत असलेले पैशांचे बंडल दखविले. त्यांना अंगावरील सर्व दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पिशवीत असलेले पैशांचे बंडल मिळतील, असे आमिष दाखविले. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंगावरील १ लाख ८९ हजार ४०० रुपयांचे ३ तोळे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या पिशवीत ठेवले.
जेष्ठ महिलेने पहिले असता, त्या पिशवीत बिस्किटांचे पुडे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कादबाने करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पाषाणमधील फिर्यादी या रविवारी सकाळी पावणेबारा वाजता पारखे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असताना, एक जण त्यांच्याजवळ आला. आणि म्हणाला आमच्या शेठजीला मुलगा झाला आहे, म्हणून ते साड्या व लुगडे वाटप करतायेत, तुम्ही चला. त्या जात नसताना देखील कपडे फुकट आहेत तर घेऊन टाका असे म्हणून त्यांना तेथे घेऊन गेला.
दरम्यान, आरोपीने जेष्ठ महिलेकडे असलेले ५० हजार रुपयांचे १ तोळ्याचे मंगळसुत्र घेतले. त्यानंतर लुगडे घेऊन येतो, असे सांगून पळून निघून गेला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक करीत आहेत.