सोलापूर : गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करून खासगी इसमामार्फत १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जेलरोड पोलीस ठाण्याचा पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण म्हेत्रे (वय ४६, रा. नर्मदा बिल्डिंग, अरविंद पोलीस वसाहत, सोलापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. पोहेकॉ किरण म्हेत्रे आणि खासगी इसम रोहित नागेश गवड (वय ३३, रा. दक्षिण कसबा, सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण म्हेत्रे व रोहित गवड यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांचा मामेभाऊ यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आयपीसी कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची बतावणी तक्रारदार यांना आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण म्हेत्रे यांनी केली होती. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता फक्त चाप्टर केस करून सोडून देण्यासाठी रोहित गवड यांच्यामार्फत २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपये इतकी ठरली होती.
या प्रकरणात आरोपीस ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात प्रक्रिया देखील करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी पडताळणी केली होती.