केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील पाटस -दौंड अष्टविनायक महामार्गावर बिरोबावाडी येथे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या लहान बालकाला चार चाकी पिकअपने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरातील वातावरण तापले असल्याने नागरिकांनी रस्ता बंद केला आहे. घटनास्थळी रस्त्यावर वाहतुकीच्या लांब रांगा लागल्या आहेत .
अपघातात जागीच मृत झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आयुश राजेश यादव (वय-8 वर्षे) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिरोबावाडी येथील अष्टविकानाय रस्त्यावरील मुख्य चौकात घडली आहे. याच चौकात जिल्हापरिषद शाळा आहे. त्याची आई आपल्या मुलीला व मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघाली होती. त्यावेळेस पाटस वरून दौंड दिशेने वेगात जाणाऱ्या पिकअपने विद्यार्थ्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेच्या चौकात अष्टविनायक महामार्गावर गतिरोध करण्याची मागणी संतप्त झाले नागरिक करत आहे. यामुळे त्यांनी दौंड पाटस अष्टविकानाय रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना शांत करण्यासाठी यवत पाटस पोलीस प्रयत्न करीत आहे..