पुणे : पुण्यातील देहू नगरीत वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 339 वा पालखी सोहळा आज पार पडणार आहे. आज संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी भाविक देहूमध्ये दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल मोरे, माणिक मोरे, संतोष मोरे महाराज यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.28) आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला. सकाळी नऊ ते अकरा संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून बारा वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा असणार आहे.
सायंकाळी पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. तर सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्कामासाठी दाखल होईल. मग याच ठिकाणी रात्री नऊ वाजता किर्तन जागर केला जाणार आहे. 19 दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा 16 जुलै रोजी पंढरीत दाखल होणार आहे.