नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्याकडे पैसे जरी नसले तरी आपल्याला काही वस्तू विकत घेता येऊ शकतात. त्यासाठी हे कार्ड महत्त्वाचं ठरतं. चांगला सिबिल स्कोअर असलेल्या बहुतांश जणांकडे क्रेडिट कार्ड असल्याचे पाहिला मिळतं. मात्र, हे कार्ड वापरताना विशेष खबरदारी न घेतल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल पण तुम्हाला ते वापरताना काय काळजी घ्यावी हे जरी माहिती नसलं तरी काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशाचप्रकारे महत्त्वाची माहिती सांगणार आहोत…
फोनवर कधीही देऊ नका कार्डची माहिती
सर्वात आधी हे लक्षात घ्यावं की कोणतीही बँक आपल्या क्रेडिट कार्ड होल्डरची माहिती कधीही फोन करून विचारत नाही. त्यामुळे फोनवरून अशा कोणत्याही संदर्भात विचारणा झाल्यास अधिक बोलणं टाळावं.
गुगलवरून नंबर शोधणं टाळाच
बँकांचा संपर्क क्रमांक शोधायचा जरी असला तरी लगेच गुगलवरून नंबर शोधला जातो. त्याचं प्रमाणही वाढले आहे, पण हे तुम्ही टाळणं गरजेचे आहे. कारण यातून दिशाभूल होऊन चुकीचा नंबर मिळू शकतो. परिणामी, मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
कधीही काढू नका एटीएममधून पैसे
बँकेच्या प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला त्यांचं कार्ड वापरून एटीएम सेंटरमधून पैसे काढण्याची मुभा दिली जाते. पण, हे कोणत्याही परिस्थितीत टाळणं गरजेचंच आहे. कारण, जेव्हा अशाप्रकारे पैसे आपण काढतो, तेव्हा त्या प्रत्येक दिवसाचे शुल्क लागू शकते. त्यामुळे रक्कम कमी पण देणंच जास्त असं होऊ शकतं. म्हणून हे टाळावं.
थेट बँकेत जाऊन करा चौकशी
यातील महत्त्वाची बाब म्हणजे काही अडचण अथवा तक्रार असल्यास बँकेत प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करायचा असल्यास कार्डवरच बँकेकडून देण्यात आलेल्या नंबरवर फोन करून माहिती घ्यावी. या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.