मुंबई : आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशन लक्षात राहत आणि गाजतं ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांच्या खडाजंगीनं. एकमेकांवर आरोपांच्या फैरी होतात. आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण यंदाच अधिवेशन मात्र वेगळं ठरल्याच चित्र समोर आलं आहे.
झालं असं की, आज सर्वात आधी विधीमंडळात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. त्यावेळी सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. ही भेट झाल्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. या दोघांनीही एकाच लिफ्टनं प्रवासही केला.
काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे अधिवेशन गाजणार हे नक्की झालं होतं. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आज मात्र खूप दिवसांनी महाराष्ट्रानं आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडचं चित्र बघायला मिळालं.
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. असंच प्रेम राहू द्या, असं म्हणत चंद्रकांत दादांनी ठाकरेंचा निरोप घेतला. पण, त्यानंतरच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची लिफ्टजवळ भेट झाली. तेव्हा ते दोघे सोबतच लिफ्टचा प्रवास करते झाले.
दरम्यान, विधिमंडळातील लिफ्टजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र दिसले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्याचा एकही चान्स न सोडणारे, कट्टर विरोधक असलेले फडणवीस आणि ठाकरे यांनी आज एकाच लिफ्टनं प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, दरेकर, प्रसाद लाडही लिफ्टमध्ये होते. लिफ्टमधून उतरल्यानंतर दोन्ही नेते दोन्ही दिशांना निघून गेले.
लिफ्टजवळ ठाकरे आणि फडणवीसांची भेट…
आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे.दरम्यान सोशल मीडियावर विधीमंडळातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस विधीमंडळाच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत उभे असल्याचे दिसून आले. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी बातचित झाली. पण त्यानंतर मात्र, लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर मात्र, दोन्ही नेते दोन विरुद्ध दिशांना निघून गेले.
दरम्यान, एरव्ही एकमेंकांवर टीकेचे झोड उठविणारे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आज एकमेकांशी अगदी हसत-खेळत बोलताना दिसले. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्रानं अनेक राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. पण आज बऱ्याच दिवसांनी विधान भवनात हसतं खेळतं वातावरण पाहायला मिळालं.