युनूस तांबोळी
शिरुर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू बुद्रुक येथील उपशिक्षक सुधीर शंकरराव रत्नपारखी यांनी नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय नेट परीक्षेत यश संपादन केले. कवठेयेमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार गणेश रत्नपारखी यांचे ते भाऊ आहेत.
संपूर्ण भारतभर आयोजित केल्या जाणाऱ्या सदर परीक्षेमध्ये मराठी विषयात पात्र झालेल्या २२० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी हे यश संपादन केले. देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य असून सदर परीक्षा ही प्रतिष्ठेची व वलयांकित समजली जाते.
सुधीर रत्नपारखी यांनी सहा महिन्यांपूर्वीच पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय सेट परीक्षेमध्ये सुयश संपादन केले होते. केवळ एकाच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यस्तरीय सेट व राष्ट्रीय नेट अशा प्रतिष्ठेच्या परीक्षांमध्ये त्यांना यश प्राप्त झाले. रत्नपारखी अनेक वर्षांपासून पोलीस भरती तसेच लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहेत. सदर यश हे त्यांनी आपले वडील गुरुवर्य माजी मुख्याध्यापक शंकरराव रत्नपारखी यांना अर्पण केले आहे.