पुणे : खडकवासला चौपाटीजवळ रिक्षाला एका स्वीफ्ट गाडीने धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत 14 वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला होता. तात्काळ त्याला पुना हॉस्पिटलमध्ये उपचार दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. स्वराज सुबोध पारगे (वय-14) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, तसेच योग्य उपचार मिळाले नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पुना हॉस्पिटल विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत सुबोध मुरलीधर पारगे (वय-46 रा. मु.पो. डोणजे, ता. हवेली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सुबोध पारगे यांचा मुलगा स्वराज हा 11 जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रिक्षाने शिकवणीवरून घरी जात होता. त्यावेळी खडकवासला चौपाटीजवळ एका स्वीफ्ट गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये स्वराज याच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुना हॉस्पिटलमध्ये त्याच्या पायाचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या मांडीचे हाड तुटल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगून पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार मुलाचे वडील सुबोध पारगे यांनी पैसे जमा केले. 14 जून रोजी सकाळी स्वराज याला भुलीचे इंजेक्शन दिले.
मात्र, रिअॅक्शन आल्याने त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेरुन औषध आणण्यास सांगितले. तसेच डायलिसीस करावे लागेल असे सांगून पैशांची मागणी केली. सुबोध पारगे पैशांची जमाजमव करत असताना 14 जून रोजी रात्री साडे सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी स्वराज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, स्वराज याला वैद्यकीय उपचारासाठी पुना हॉस्पिटल येथे अॅडमिट केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी स्वराज याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर वेळेवर योग्य ते उपचार केले नाहीत. त्यामुळे स्वराज याचा मृत्यू झाल्याचे सुबोध पारगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.