मुंबई : ‘बिग बॉस फेम’ अभिनेता जय दुधाणे हा घराघरात पोहोचून लोकप्रिय झाला आहे. नुकतीच त्याने मराठी मालिकाविश्वात एन्ट्री घेतली. अभिनेता जय दुधाणे आणि त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जय दुधाणे याचे वडील अनिल दुधाणे यांचे निधन झाले आहे. जय दुधाणे याने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. मी माझा सुपरहिरो गमावला असल्याची भावूक प्रतिक्रिया जयने व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये जयने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. 24 जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. तो फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्याच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक रत्न होता. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले. सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती. नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला”.
“माझे सर्व मित्र ते ज्यांना काका म्हणायचे, त्यांचे सर्व मित्र जे त्यांना अनिलभाई म्हणायचे, तसेच त्यांना ओळखत असलेल्या सर्व लोकांसाठी, तुम्ही आता त्यांना शेवटचे पाहू शकता. ते आपल्या हृदयात, आपल्या मनात कायम राहतील. या पुढे 24 जून 2024 हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल. कारण मी फक्त माझे वडीलच नाही तर एक खरा मित्र, खरा पालक आणि एक खरा माणूस गमावला आहे”. “तुम्ही जिथे असाल तिथे देव तुमचे कल्याण करो. तुम्ही नेहमी आणि नेहमी माझ्या हृदयात राहशील. मी तुमच्यावर कायम प्रेम करत राहीन” असं म्हणत वडिलांबद्दलच्या शेवटच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, जय दुधाणे हा ‘Splitsvilla’ या कार्यक्रमामुळे तो सर्वत्र लोकप्रिय झाला. यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतली. सध्या जय ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे.