पुणे : येथील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहे. सध्या डॉक्टर आणि त्यांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये विशेष लक्ष ठेवलं जात आहे. अद्यापतरी त्यांच्यामध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.
एरंडवणा येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा डॉक्टरच आहे. या 46 वर्षीय डॉक्टराच्या संपर्कात त्याची 15 वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यावेळी स्वतः डॉक्टरांनी रक्ताचा नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवलेला होता. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना यासंदर्भातील माहिती अमोर आली आहे. यानंतर डॉक्टरच्या मुलीमध्ये देखील झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तिच्या रक्त राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवले होते. या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
एरंडवणा परिसरात दोन रुग्ण आढळून आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे. तसेच डासोत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन भागातील सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना प्रथमोपचार देऊन रक्ताचे नमुने संकलित केले जात आहेत.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. तसेच एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.
“एरंडवणा परिसरात आढळून आलेल्या झिकाच्या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. सध्या महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत,”
– कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख- पुणे महानगरपालिका