पुणे : सध्या राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र मान्सूनने अजूनही सुट्टी दिली आहे. त्यामुळे शेतीची काम सुद्धा खोळंबली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत ढगाळ वातावरण राहणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अशंतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज राज्यात पावासाचा जोर कायम राहणार आहे. आज कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागाला पावसाची हुलकावणी
मान्सूनच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच आहेत. दरम्यान, पूर्व विदर्भात पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे.
चांगला पाऊस, शेतीच्या कामांना वेग
राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या भागात अद्याप चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे, आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.