नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज सकाळी शाळेत गेल्यानंतर तिला चक्कर आल्याने बेंच वरुन खाली पडून या विद्यार्थ्यानीचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. मात्र, मृत्यूचे ठोस कारण अद्याप समजू शकले नाही. मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. दिव्या त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेमध्ये अचानक चक्कर आल्याने ती बेंचवरून खाली पडली.
या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. तसेच पोलिसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.