AFG vs BAN : अफगाणिस्ताननं आज ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात नवा इतिहास घडवला आहे. अफगाणिस्तानने अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकात ५ बाद ११५ धावांचीच मजल मारली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान ठवण्यात आलं.
अफगाणिस्ताननं बांगलादेशला १८ व्या षटकांत १०५ धावांत रोखलं. या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर एट साखळीतच संपुष्टात आलं आहे.
थरारक लढतीत अफगाणिस्तानं मारली बाजी
बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला 115 धावांवर रोखलं होतं. लो स्कोअरिंग सामना असल्यामुळे बांगलादेशचे पारडे जड वाटत होते परंतु अफगाणिस्तानच्या गोलंदाजीनं पुन्हा एकदा लो स्कोअरिंगची मॅच जिंकण्यासाठी जोरदार कामगिरी केली आणि इतिहास घडवला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकनं बांगलादेशच्या चार विकेट घेतल्या. फाझलहक फारुकीनं एक विकेट घेतली.
अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खाननं चार विकेट घेतल्या. बांगलादेशकडून लिटन दासनं 54 धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. सौम्या सरकारनं 10 तर तोहिद हरिदोयनं 14 धावा केल्या. अफगाणच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशचे इतर फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना वेगात धावा काढल्या नाहीत. रहमानुल्लाह गुरबाझनं 43 धावा केल्या. इब्राहिम जरदान 18 , आझमतुल्लाह ओमरझाईनं 10 आणि राशिद खाननं 19 धावा केल्या.
अफगाणिस्ताननं इतिहास रचला
अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं त्यानंतर आज बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजनं 43 धावा केल्या. यानंतर राशिद खान आणि नवीन-उल-हक या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानच्या विजयामुळं आता ऑस्ट्रेलियाचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.