मांडवगण फराटा: शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील जगताप वाडीतील एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळाला आहे. सदर घटना शनिवारी (दि.२२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
शेतकरी महिला कल्पना बाळासाहेब जगताप यांच्या ऊसाच्या शेतातून वीज वितरण कंपनीची मेन लाईन गेली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऊसातील खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडून आग लागली होती. रात्रीची वेळ असल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. जगताप यांनी महावितरणकडे वारंवार लोंबकळत असलेल्या विद्युत तारा ओढण्याची विनंती केली होती. तसेच खांबावर चिनी मातीच्या फुटलेला कप बदलण्याचीही विनंती केली होती. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप जगताप यांनी केला.
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जळीत झालेल्या ऊसाच्या शेताची पाहणी करून पंचनामा केला आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रेय फराटे, अंकुश शितोळे, रावसाहेब जगताप, सुनिल जगताप, अशोक जगताप, बाळासाहेब जगताप यांनी केली आहे.